वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार
वाडेबोल्हाई तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीने महावितरण कडून वीज मीटर न घेता सुरू केलेले जवळपास 15 ते 20 पथदिवे महावितरणच्या कारवाईच्या धाकाने तातडीने काढून घेतल्याचा प्रकार दि. २१ रोजी घडला आहे. गेल्या तीन महिन्यापासून ग्रामपंचायत कडून चालू असलेली वीज चोरी उघडकीस आली आहे.
महावितरण कडून रीतसर वीज मीटरची परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू असलेल्या पथदिव्यांच्या बाबतीत दि.२७ मे २०२४ रोजी सरपंच/ ग्रामसेवक यांच्याकडे रीतसर तक्रार ग्रामस्थांनी केली होती. याची ग्रामपंचायत कडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतिने अनधिकृत पथदिवे उभे करून रीतसर विजेची जोडणी न करता सुरू असलेल्या वीज चोरी बाबत कळवले असता ग्रामपंचायतीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दिल्यानंतर वाडेबोल्हाई ग्रामपंचायत प्रशासनाने अनधिकृत पथदिवे तातडीने काढून घेतल्याने ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार उघडकिस आला आहे.
१५ ते २० पथदिव्यांच्या बाबतीत रीतसर वीज जोडणी करून घेण्याबाबत यापूर्वी ग्रामपंचायतला कळवले होते. दि. २१ रोजी विना मीटर जोडणी असलेले अनधिकृत पथदिवे ग्रामपंचायत ने काढून घेतले आहेत.
अमोल पायगुडे, वायरमेन
अनधिकृत पथदिवे तातडीने काढून घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. ग्रामपंचायत तीवर वीज चोरी बाबत महावितरण कडून कोणती कारवाई करण्यात आली नाही.
संतोष भोसले, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत
वाडेबोल्हाई ग्रामपंचायत हद्दीतील वीज मीटर नसलेले १६ पथदिवे तातडीने काढून घेण्यात आले आहेत.
वैशाली केसवड, सरपंच
वाडेबोल्हाई ग्रामपंचायत
ग्रामपंचायत वर कारवाई होणार का? …
विजेचा बिलाचा भरणा केला नाही म्हणून सर्वसामान्य नागरिकांना विज जोडणी तात्पुरती स्थगित केल्याचा तसेच वीज चोरी बाबत महावितरण कडून तातडीने कायदेशीर कारवाया झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ग्रामपंचायत कडून अनधिकृत पथदिवे उभे करून रीतसर विज जोडणी न करता झालेल्या वीज चोरी बाबत महावितरण कडून कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.