वाघोली, दि. 3 प्रतिनिधी);
पोलीस कारवाई करीत नसल्याने वाघोली पोलीस चौकीत स्वतःला पेटवून घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. संबंधित युवकाला अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्तांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. ही घटना ताजी असतानाच सोमवारी सांयकाळी दोन तरुणांनी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा पर्यंत हॉटेल चालू ठेवल्याने पोलीसांनी कारवाई केली म्हणून या तरुणांनी हे पाऊल उचलले.मात्र पोलीसांनी ते उधळून लावले. त्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलीसांनी हॉटेल मालक सत्यवान हौशीराम गावडे (वय ३४ , रा. उबाळेनगर, वाघोली ) व त्याचा कामगार राम अशोकराव गजमल (वय 22, रा. उबाळेनगर,वाघोली ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल “न्यू प्यासा” रविवारी रात्री दीड वाजल्यानंतर देखील सुरू होते.रात्रगस्त अधिकारी पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सीमा ढाकणे यांनी संबंधित हॉटेलच्या कामगारावर हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. याचा जाब विचारण्यासाठी हॉटेल मालक कामगारांसह लोणीकंद पोलीस स्टेशन येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता आले होते. “माझ्या हॉटेलवर कारवाई केल्यास मला आत्महत्या करावी लागेल” असे म्हणून धमकाऊ लागला.
हॉटेल नियमानुसार चालवावे लागेल तसेच आत्महत्या करणे हा देखील गुन्हा असल्याची माहिती त्यांना पोलिसांनी दिली. तरी देखील थोड्या अवधीनंतर हॉटेल मालक व कामगार यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन आरडाओरड सुरू केली. तसेच अंगावर दोघांनीही ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असणारी ज्वलनशील पदार्थाची बाटली काढून घेतली. तसेच त्यांना आत्महत्या करण्यापासून त्वरित परावृत्त केले. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी हॉटेल मालक व चालकाविरुद्ध पोलीस स्टेशनच्या आवारात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
लोकप्रतिनिधीशी गैरवाजवी भाषा; पोलीस कर्मचारी निलंबीत
आमदार महेश लांडगे यांच्याशी दूरध्वनीवरून गैरवाजवी शब्द वापरुन आक्षेपार्ह वक्तव्य
-आमदार महेश लांडगे यांच्याशी दूरध्वनीवरून गैरवाजवी शब्द वापरुन आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल लोणीकंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमित अरुण देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी हे आदेश काढले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका जमिनीच्या वादाबाबत राजेश सांकला, रमेश कावेडिया व जगदीशप्रसाद आगरवाल यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची चौकशी देशमुख यांच्याकडे होती. याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
देशमुख यांनी लांडगे हे लोकप्रतिनिधी असताना कोणतेही भान न ठेवता मराठी माणुस हा एक ब्लॅकमेलर आहे” अशा प्रकाराचे गैरवाजवी शब्द वापरुन त्यांच्याशी आक्षेपार्ह भाषा केली. याबाबतची तक्रार आल्यानंतर देशमुख यांची खात्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली..