शिरूर लोकसभा मतदार संघात ५० हजार कोटींच्या रस्त्यांची कामे हाती ; वाघोलीतील समस्या सोडविण्याची अजित पवार यांची ग्वाही
वाघोली : पुणे-नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते शिरूर पर्यंत डबल डेकर एलिव्हेटेड फ्लायओव्हर १० हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार असून त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या कमी होईलच परंतु प्रदूषण देखील कमी होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्याचबरोबर वाघोलीला भेडसावणाऱ्या विविध पाणी, कचरा, ड्रेनेज व मुलभूत समस्या सोडविण्यासाठी पुढील काळात काम केले जाईल व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्याच्या भोवतालचा २० हजार कोटी रुपयांचा रिंगरोडचा प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला असून त्याच्या कामालाही सुरुवात केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वाघोलीतील केसनंद फाटा येथे आयोजित सभेत गडकरी व पवार बोलत होते. या प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर हवेलीतील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले कि, पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. यामुळे कितीही रस्ते बांधले तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. यासाठीच दोन लाख कोटी रुपयांची विकास कामे पुणे विभागात होत आहेत. महाराष्ट्र संतांची भूमी आल्याने पुणे ते पंढरपूर पालखी महामार्ग बांधला. त्याचे निवडणुकीनंतर उद्घाटन होईल. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी रस्ते बांधणी केली जाणार आहे. विशेषतः शिरूर मतदार संघात येणारे नाशिक फाटा-खेड, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, हडपसर ते यवत या रस्त्यावर डबल डेकर फ्लायओव्हर तर रिंग रोडचे कामही राज्य शासन करणार आहे त्यामुळे याठिकाणी जवळपास ५० हजार कोटी रुपयांची कामे होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोडचा प्रकल्प हाती घेतला. पीएमआरडीएमार्फत अन्य एक रिंग रोड बांधणार आहे. यामुळे बाहेर जाणारी वाहने शहरात येणार नाही. पुण्याचा विस्तार होत असल्याने मेट्रोचा विस्तारही चारही बाजूने करणार आहे. मुळशी धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून पुण्यात पाणी समस्या निर्माण होणार नाही. अशी अनेक विकास कामे करायची आहेत. यासाठी मोदींना पुन्हा निवडून देण्याची गरज आहे. वाघोलीचे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक संपल्यानंतर त्या प्रश्नाकडे निश्चित लक्ष देईल.
वाघोलीतील सभेने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह
शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी वाघोलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या सभेला वाघोली परिसरातून पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांनी जवळपास साडे पाच हजार मतांची वाघोलीतून आघाडी घेतली होती. यावेळी देखील आढळराव पाटलांना पुन्हा आघाडी मिळवून देण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.