वाघोली : वाघोली परिसर व मुख्य चौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. वाघोलीसह परिसरातील गावांमध्येही ठिकठीकाणी शिवजयंतीचा उत्साह दिसून येत होता.
रात्री पासूनच शिवभक्त किल्ले सिंहगड येथून जयघोष करीत शिवज्योत आणण्यासाठी रवाना झाले होते. सकाळी शिवज्योत घेऊन शिवभक्त वाघोलीत दाखल झाले. अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दिवसभर संपुर्ण परिसर शिवमय झाला होता. महिलांनीही शिवजयंती साजरी करण्यात सहभाग घेतला. तरुणांनी दुचाकी, चारचाकी वाहनांना भगवे झेंडे बांधून उत्साहात सहभाग घेतला. वाघोलीच्या सर्वच भागामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.