: वाघोली येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाचे डिसीपी शशिकांत बोराटे यांनी वाघोलीतील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांसोबत बुधवारी (१४) पायी फिरून समस्या जाणून घेतल्या. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना लोणीकंद वाहतूक विभागाला त्यांनी दिल्या तर अन्य उपाययोजना करण्यासाठी महापालीका व अन्य विभागाची संयुक्त बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.
केसनंद फाटा येथून पाहणीला सुरुवात करण्यात आली. वाहतूक कोंडीची कारणे त्यांनी जाणून घेतली. उलटी होणारी वाहतूक, महामार्गावर पार्क होणारी वाहने. अडथळा ठरणारे विद्युत पोल, पदपथावर होणारे अतिक्रमण, रस्त्यावर येणारे सांडपाणी, मंगळवारी आठवडे बाजारा मुळे वाहतुकीला होणारी अडचण, सकाळी व संध्याकाळी होणारी अवजड वाहतुक, महामार्गावर थांबणारे कंटेनर, रस्त्यावर बसणारे विक्रेते, महामार्गाची कमी रुंदी, रस्त्यातच थांबणाऱ्या पीएमटी बसेस व त्यामुळे वाहतुकीला होणारी अडचण, खाजगी ट्रॅव्हल्स मूळे होणारी वाहतूक कोंडी या सर्व बाबींची पाहणी करून काय उपाययोजना करता येतील याची चर्चा उपस्थितांबरोबर केली. जे रस्ते मुख्य महामार्गाला जोडून वाहतूक कोंडी कमी करता येईल त्या अंतर्गत रस्त्याची पाहणीही त्यांनी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते संपत गाडे, कृष्णकांत सातव, कल्पेश जाचक, शिवदास पवार,सुधीर तोरडमल,प्रकाश जमधडे,पुणे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक राजकुमार शेरे, लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.